Friday, March 9, 2012

jogging track

         एखादी गोष्ट करायला किंवा चालू ठेवायला काहीसं motivation लागतं, नाहीतर सुरवातीचा उत्साह  नंतर झपाट्याने दिसेनासा व्हायचा संभव असतो. माझ्या jogging  किंवा brisk walking  म्हणूयात; त्याबाबतीत हि असंच काहीसं व्हायला लागला होतं. ४५ मिनिटे सलग चालायचं, ( weight  loss करायचं म्हंटल्यावर आजूबाजूने दहा-बारा सल्ले येतात त्यापैकी हा एक सल्ला)  नंतर नंतर अगदी जीवावर आलं होतं. एकतर भराभर चालायचं , त्यात मैदानावर असलेल्या  बालविकास मंडळातील मुलांचे पालक jogging  track वर गप्पा मारत बसलेले असतात, त्यातून वाट काढत फिरायचं , मोठ्या मुलांचा फुटबाल आता अंगावर येईल कि नंतर याकडे लक्ष द्यायचं हे नाही म्हणायला जरा बोअर व्हायला लागलं. मग वेळ बदलली. जरा उशीरा जायला लागले. कधी आमच्याच कॉलनीत आणि वेळ असलाच तर पुलोद्यानात जायला लागले. 
         आता जरा बदल जाणवायला लागला.  jogging  track च्या बाहेरील बाजूला नगरसेवकांच्या कृपेने छानशा खुर्च्या ठेवलेल्या आहेत. त्यावर बसून वेगवेगळ्या वयाची मंडळी  आपलं मन (बहुतेक mobile वरच ) मोकळं करत असतात. फिरता फिरता काही गोष्टी कानावर पडू लागतात.  प्रत्येकाचं वयानुसार बोलणं जरा इंटरेस्टिंग वाटू लागतं . एक विशीतली मुलगी, " शेवटी तुझ्या नशिबात लव्ह marriage च होतं ना." (यातल्या 'ना 'पुढे पूर्णविराम, प्रश्नचिन्ह किंवा उद्गारवाचक चिन्ह यापैकी कुठलंच फिट होणार नाही असं स्वर होतं तिचा.)  एक मध्यमवयीन गृहस्थ,' आता अर्ज दिलायस ना मग मी बाकीचं बघून घेतो." असं शासकीय भाषेत बोलत होते. मध्ये  काही college मधले मित्र, " तीन महिन्याने सांगितला तिने मला कि I am  not interested ."   " अगं तो मला पहिल्या डेट ला दगडूशेठ गणपतीला जाउ म्हणाला." आणि मग  धो धो हसणं. यात माझा अर्धा तास कसा निघून जातो ते कळत नाही. 
       पुलोद्यानात तर वेगळंच प्रकरण आहे. तिथे अर्ध्याहून अधिक मुलं आपल्या गर्ल्फ्रेन्डचा  तळ्याकाठी, टेकडीवर, धबधब्याच्या पार्श्वभूमीवर फोटो काढण्यात बिझी असतात.  त्यांचा मधून जाताना excuse me म्हणत मलाच अपराधी वाटतं. असंच एकदा फिरता फिरता मी धबधबयाजवळच्या बाकावर टेकले. पाचच मिनिटात एक जोडपं मागच्या बाकावर येउन बसलं. लग्न ठरलं असावं बहुधा. झालं, तो जो काही बोलत सुटला; काही तक्रारी काही सूचना आणि बरंच काही. आजूबाजूची हिरवळ, पाण्याचा खळाळता आवाज याबाबत जरा उदासीनताच दिसली.तीचा आवाज मात्र एकदाही आलं नाही. हे एकतर्फी स्वगत मी मागे वळून पाहिल्यावर थांबलं.  एक दिवस तर मजाच झाली. त्याच जागेवर माझ्या शेजारी दोन जुळी बाळे, त्यांची आई आणि आजी होत्या. माझ्या आधीच होत्या तिथे. एक बाळ आईकडे झोपले होते तर एक आजीकडे खेळत होते. आजीकडच्या  बाळाने डायपर बदलायची वेळ आणली. आईकडच  बाळ तर झोपलं होतं, मग इकडे तिकडे बघत काहीशा संकोचाने तिने झोपलेले बाळ 'जरा घ्याना' म्हणत माझ्याकडे सोपवले. मला क्षणभर मी मूर्तीमंत आई च दिसते की काय असं वाटून गेलं. इथेही तेच?:)) बर डायपर लवकर बदलून बाळाला घ्यावं की नाही! तर मायलेकींच्या गप्पा सुरूच.  मला वाटलं हे बाळ उठलं तर बरं होईल पण ते ही माझ्या कुशीत इतकं मस्त झोपलं होतं की माझीही उठायची पंचाईत.  थोड्या वेळाने त्यांचा साग्रसंगीत कार्यक्रम उरकल्यावर बाळ आईकडे सुपूर्द केले. आणि मी परत पाण्याचा आवाज ऐकत राहिले. 
      पूर्वी मी  राहुल बोसचा ' Everybody says I am fine '   हा चित्रपट पहिला होता. त्यातल्या protagonist ला (हिरो) त्याच्या client च्या मनातले समजत असते. तसं काहीसं फिरताना वाटतं. वेगळे स्वभाव, आनंद, reactions . प्रत्येक जण वेगळा त्याचं विश्व वेगळं त्याचं आभाळही वेगळं. 
आता फिरायला जाताना वेगळ्या motivation ची मला गरज पडत नाही. पाउणतास  मस्त जातो.