रस्त्याने जाताना झाडावर लगडलेल्या कैऱ्या बघून पावलं क्षणभर रेंगाळतात. डोळे विस्फारून मी झाडाकडे बघत असते; जशी आता मुलं MacD च्या मेनू display कडे बघतात तशी. कितीही मोठे झालो तरी काही गोष्टी आपल्यातील बालपणाचे पुरावे देताच असतात. त्या गोष्टी दिसल्या रे दिसल्या की U turn घेउन निघतोच आपण तिकडे. कैरीचं ही असंच आहे माझ्याबाबतीत. डिसेम्बर मध्ये झाडावर मोहोर डोलायला लागल्यावर ते कैऱ्यांना पाड लागेस्तोपर्यंतचा कैरी बरोबरचा माझा प्रवास तेवढाच आंबट-गोड आणि exciting असायचा.
माझ्या घरच्या मागच्या दारात आंब्याचे झाड होते. दर डिसेंबरमध्ये छोट्या छोट्या ख्रिसमस ट्री सारखा मोहोर दिसायला लागला की यंदा आंबा किती येणार याचा अंदाज बांधायला सतत मान वर करून मी झाडाकडे बघत असायचे. मोहोराचा सुरेख वास येत राहायचा. गळलेल्या मोहोरातील इवल्याशा कैऱ्या पण खाव्याशा वाटायच्या.
जातायेता दारातून, स्वैपाकघराच्या खिडकीतून माझे लक्ष असायचे. पडलेल्या बाळ कैऱ्यांचे भातुकलीत हमखास लोणचे व्ह्यायचे. थोड्याच दिवसात आम्ही मैत्रिणी मोठ्या झालेल्या कैऱ्या मोजायचो. फार देखण्या कैऱ्या असायच्या ; एकदम करकरीत आणि आंबट गोड. कैऱ्यांच्या बाबतीत मी खूप possessive होते. जोरात वारा आला की कौलावरून कैऱ्या गडगडत खाली पडायच्या. पण गंमत अशी की त्या खाली पडायच्या आत मी मागच्या दारात पोचलेली असायची. माझ्या मैत्रिणींना कैऱ्यांना हात लावून द्यायचे नाही. पण नंतर मात्र तिखट मीठ लावून आम्ही मस्त चटक मटक करत कैऱ्या खायचो. हळू हळू कैऱ्या काढण्याच्या दिवस यायच्या. काकू ठराविक माणसाकडून कैऱ्या उतरवायची. आम्ही कैऱ्या मोजायला असायचोच खाली. झाडात लपलेल्या कैऱ्या काढता काढता चांगल्या चारशे पाचशे कैऱ्या निघायच्या. काकू मग काही कैऱ्यांचे सारखे वाटे करून कॉलनी मध्ये प्रत्येकाच्या घरी कैऱ्या देण्यासाठी आम्हाला पाठवायची. आणि उरलेल्या कैऱ्यांचे मग मोरंबा, लोणचे आणि अढी. ते तीन चार महिने मनात कैऱ्या आणि फक्त कैऱ्याच.
मागच्या वर्षी काकूला घेवून कॉलनीत जाऊन आले. मागच्या दारी आंब्याचं झाड नव्हतं. छोटी मुलं आजूबाजूला खेळत होती आमच्यासारखीच. जरावेळ पायरीवर बसले
झाडाच्या आठवणीत आनंदात वेळ गेला. आता मी काय आणि माझ्या मैत्रिणी काय किलोवर कैऱ्या घेत असतो त्या कैऱ्यांची आठवण काढत.
कैऱ्या, बुचाची फुलं, गोवऱ्या, ऊस, बैलगाड्या या गोष्टी चित्रात दिसल्या तरी भानावर यायला थोडा वेळ लागतो मला. कैऱ्या विकत घेताना तर हटकून आठवण येते गावाची. या गोष्टींशी जुळलेली नाळ सहजासहजी सुटत नाही. शेवटी गावाकडची मी कुठेही राहिले तरी गावाकडचीच राहणार.
