galleryतील पु. लं.
त्यादिवशी नेहमीप्रमाणे सकाळी घोले रोडवरून मी आणि नयना निघालो. रूपालीत नाश्ता केला. आणि नयना युनिव्हर्सिटीत आणि मी जोशी हॉस्पिटलला निघाले. नुकतीच मी तिथल्या कॉम्प्युटर सेक्शनला जॉईन झाले होते. ९४ -९५ साल असेल ते. भांडारकर रोडवरून चालत कमला नेहरू पार्कपाशी वळले. मला नुकतंच समजलं होतं की पु. लं. रुपालीत राहतात म्हणून. माझी पहिली नोकरी आणि त्यात पु. लं. च्या घराशेजारी म्हणून मी खूष होते. पण एक दोन महिने झाले तरी पु. लं काहीकेल्या दिसत नव्हते. तरी सवयीने डाव्या बाजूच्या अपार्टमेंटकडे बघत जरा सावकाश चालत होते. आणि आज माझं भाग्य की पु. लं. आणि सुनीताबाई दोघंही gallery मध्ये उभे होते. चेहरा शांत. सुनीताबाई काहीतरी बोलत होत्या आणि ते लक्षपूर्वक ऐकत होते. तिथे रेंगाळावंसं वाटत होतं; पण ९ वाजायला आल्याने निघण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यानंतर काही दिवसांनी संध्याकाळी निघताना पु. लं., सुनीताबाई आणि काही मंडळी कारमधून उतरताना दिसली. पु. लं. थकल्यासारखे दिसत होते. लगेचच ते अपार्टमेंट मध्ये शिरले.
काही सेकंदांचंचं त्यांचं ते अस्तित्व आणि माझं भारावून जाणं. असं भारावलेपण मी परत आयुष्यात कधीच अनुभवले नाही.
साखरवाडीत असताना कार्यक्रमांच्या निमित्ताने अशी खूप व्यक्तीमत्व जवळून पाहायला मिळाली. भीमसेन जोशी,जितेंद्र अभिषेकी, भक्ती बर्वे, श्रीराम लागू. द. मा., वं.पु. यांचा दर्शन दरवर्षी असायचंच. पण हा जिव्हाळा, आपुलकी पु. लं. च्या बाबतीतच का होती?
पु. लं. चा humour मला जवळचा वाटायचा कारण की आम्हीही चाळ संस्कृतीतले. त्यांनी लिहिलेल्या बऱ्याच गोष्टी आढळायच्या आजूबाजूला. तेंव्हा पु .लं. ना ऐकायचं म्हणजे फक्त पोट भरून हसायचं असं काहीसं स्वरूप होतं. मधल्या काळात पु. लं जरा लांब गेले. काही वर्षांनी पु.लं. चं गुण गाईन आवडी मिळालं. आणि मला वाटतं भारावलेपण तेंव्हाचं सुरू झालं. प्रचंड मोठी प्रतिभा असणारी माणसे भेटली . प्रभावी लिखाणाशी तेंव्हा खरी ओळख झाली.
त्यानंतरच्या टप्प्यात पु. लं. ची केवळ लेखक म्हणून नाही तर माणूस म्हणून ओळख पटायला लागली. असा विचार येत गेला की या माणसाने आपल्याला नक्की काय देण्याचा प्रयत्न केलाय आणि आपण काय घेतलंय? पु. लं.नी साहित्य संपदेहून अधिक बरचं काही दिलं याबाबत अनभिज्ञ राहण्याचा नाठाळपणा घडला खरा.
पु. लं नी खरतर माणसं वाचायला शिकवली. प्रसंगी विक्षिप्त व्यक्तींकडून होणारा त्रास त्याला जरा तटस्थपणे विनोदी झालर लावल्यामुळे काही प्रमाणातका होईना कमी होऊ लागला. अती practical, अती बुद्धिमान , अती श्रीमंत या नावाखाली टेंभा मिरवणाऱ्या लोकांच्या मुखवट्याखालचा दांभिकपणा क्षणात ओळखता येऊ लागला. साध्या खरेपणाची ओढ वाटू लागली. हृदयातला ओलावा संपून जायची भीती वाटेनाशी झाली.
थोडक्यात काय जीवनात आनंददायक गोष्टी या खूप सध्या आणि जवळच असतात याची उपरती होऊ लागली. आयुष्यात असे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात (कुणी कबूल करो अथवा न करो ) की आपण कुणासाठी जगतोय असं प्रश्न पडतो. कुठल्याही अध्यात्मिक पुस्तकापेक्षा पु. लं. च्या पुस्तकातील कुठलेही पान वाचले तरी उत्तर आपोआप मिळते. अजूनही gallary तले पु लं. आणि सुनीताबाई आठवण आली की डोळ्यासमोर असतात जसेच्या तसे.
