Monday, October 22, 2012

शीळ न वाजवणारा माणूस

माझ्या  दीड वर्षाच्या  भाचीला , तीन वर्षाच्या  भाच्याला  आणि माझ्या  मुलांना एकत्र असताना कधी जिंगल्स, किंवा कार्टून नेटवर्क वरचं टायटल  साँग  उस्फूर्तपणे गात असताना मी नेहमी ऐकते. पण खरी मजा येते ती ते एकेकटे खेळण्यांशी खेळत असताना, इलेक्ट्रोनिक gadgets  हाताळताना मस्तपैकी गुणगुणत असतात तेंव्हा. खरा सूर तेंव्हा लागलेला असतो. 

मग नुसतं गुणगुणण्या पासून ते मैं हू जीयान, साउंड ऑफ म्युझिक पर्यंत मस्त गाणी रेंगाळतात कानावर. परवा मुलं शीळ वाहवून गाणं म्हणायचा प्रयत्न करीत होती. म्हटलं अरे खरंच की. बरेच दिवसात असं शीळ वाजवून कुणी गाणं गुणगुणलेलं कानावर पडलंच नाही. 

गाणं गुणगुणायला असं काय लागतं... नाही का?  फारच सोप्पं आहे. :-)

सकृतदर्शनी हे जरी खरं असलं तरी सहज तोंडातून एक लकेर निघणं हे येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.

 आम्हाला शाळेत एक गोष्ट होती. एक राजा फर्मान काढतो कि "आज पासुनी सर्व बोलणे व्हावे केवळ  गाणे गाणे . केवळ गाणे आणि तराणे , चालणार नच इतर फलाणे." आणि त्यानंतर प्रजेची आणि खुद्द राजाची खूप त्रेधा  तिरपीट  उडते. आम्ही मैत्रिणी त्यानंतर बरेच दिवस सगळं गाण्यात बोलून पोटभरून  हसायचो.  नंतर ये शाम मस्तानी सारखी शीळ वाजवायचा ही प्रयत्न केला गेला पण फारसं जमलं नाही. शेजारी अनिलमामाच्या घरातून शास्त्रीय संगीतातले सूर यायचे कानावर. रात्र रात्रभर  गाणी म्हणून जागवलेल्या मंगळा गौरी , गाण्याच्या भेंड्या ...  गाणं म्हणजे तुम्ही आनंदात आहात याचं प्रतीकच. दुसरं तात्विक कारण कशाला शोधायचं ; नाही का?shower खाली म्हणलं काय, जिने उरताना स्वतःच्या तंद्रीत शीळ वाजवून म्हणलं काय किंवा मुलांचे डबे भरताना गुणगुणला काय! शेवटी गाणं ओठावर  आलं की खुशाल समजावं माणूस जिवंत गडी आहे खरा. मनात असतं तेच ओठावर येतं.

 खरं सांगू, गाणं कधीच न गुणगुणणाऱ्या  माणसांची मला भीती वाटते.   कारण खरंच हे येऱ्या गबाळ्याचे काम नोहे. 

Saturday, June 23, 2012

galleryतील  पु. लं. 

                     त्यादिवशी नेहमीप्रमाणे सकाळी घोले रोडवरून मी आणि नयना निघालो. रूपालीत नाश्ता केला. आणि नयना युनिव्हर्सिटीत आणि मी जोशी हॉस्पिटलला निघाले. नुकतीच मी तिथल्या कॉम्प्युटर सेक्शनला जॉईन झाले होते. ९४ -९५ साल असेल ते. भांडारकर रोडवरून चालत कमला नेहरू पार्कपाशी वळले. मला नुकतंच समजलं होतं की  पु. लं. रुपालीत राहतात म्हणून. माझी पहिली नोकरी आणि त्यात पु. लं. च्या घराशेजारी म्हणून मी खूष होते. पण  एक दोन महिने झाले तरी पु. लं काहीकेल्या दिसत नव्हते. तरी सवयीने डाव्या बाजूच्या अपार्टमेंटकडे बघत जरा सावकाश चालत होते.   आणि आज माझं भाग्य की पु. लं. आणि सुनीताबाई दोघंही gallery मध्ये उभे होते.  चेहरा शांत. सुनीताबाई काहीतरी बोलत होत्या आणि ते लक्षपूर्वक ऐकत होते.  तिथे रेंगाळावंसं वाटत होतं; पण ९ वाजायला आल्याने निघण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यानंतर काही दिवसांनी संध्याकाळी निघताना पु. लं., सुनीताबाई आणि काही मंडळी कारमधून उतरताना दिसली. पु. लं. थकल्यासारखे दिसत होते. लगेचच ते अपार्टमेंट मध्ये शिरले.
                      काही सेकंदांचंचं त्यांचं ते अस्तित्व आणि माझं भारावून जाणं. असं भारावलेपण मी परत आयुष्यात कधीच अनुभवले नाही. 
साखरवाडीत असताना कार्यक्रमांच्या निमित्ताने अशी खूप व्यक्तीमत्व जवळून पाहायला मिळाली. भीमसेन जोशी,जितेंद्र अभिषेकी, भक्ती बर्वे, श्रीराम लागू. द. मा., वं.पु. यांचा दर्शन दरवर्षी असायचंच. पण हा जिव्हाळा, आपुलकी पु. लं. च्या बाबतीतच का होती? 
                       पु. लं. चा humour  मला जवळचा वाटायचा कारण की आम्हीही चाळ संस्कृतीतले. त्यांनी लिहिलेल्या बऱ्याच गोष्टी आढळायच्या आजूबाजूला. तेंव्हा पु .लं.  ना ऐकायचं म्हणजे फक्त पोट भरून हसायचं असं काहीसं स्वरूप होतं. मधल्या काळात  पु. लं जरा लांब गेले. काही वर्षांनी पु.लं. चं गुण गाईन आवडी मिळालं. आणि मला वाटतं भारावलेपण तेंव्हाचं  सुरू झालं. प्रचंड मोठी प्रतिभा असणारी माणसे  भेटली .  प्रभावी लिखाणाशी तेंव्हा खरी ओळख झाली. 
                      त्यानंतरच्या टप्प्यात पु. लं. ची  केवळ  लेखक म्हणून नाही तर माणूस म्हणून ओळख पटायला लागली. असा विचार येत गेला की या माणसाने आपल्याला नक्की काय देण्याचा प्रयत्न केलाय आणि आपण काय घेतलंय? पु. लं.नी साहित्य संपदेहून अधिक बरचं काही दिलं याबाबत अनभिज्ञ राहण्याचा नाठाळपणा  घडला खरा. 
                      पु. लं नी खरतर माणसं वाचायला शिकवली. प्रसंगी विक्षिप्त व्यक्तींकडून होणारा त्रास त्याला जरा तटस्थपणे विनोदी झालर लावल्यामुळे काही प्रमाणातका होईना कमी होऊ लागला. अती  practical, अती बुद्धिमान , अती श्रीमंत   या नावाखाली  टेंभा मिरवणाऱ्या लोकांच्या मुखवट्याखालचा दांभिकपणा क्षणात ओळखता येऊ लागला. साध्या खरेपणाची ओढ वाटू लागली. हृदयातला  ओलावा संपून जायची भीती वाटेनाशी झाली. 
                   थोडक्यात काय जीवनात  आनंददायक  गोष्टी या खूप सध्या आणि जवळच असतात याची उपरती होऊ लागली. आयुष्यात असे क्षण  प्रत्येकाच्या आयुष्यात येतात (कुणी कबूल करो अथवा न करो ) की आपण कुणासाठी जगतोय असं प्रश्न पडतो. कुठल्याही अध्यात्मिक पुस्तकापेक्षा पु. लं. च्या पुस्तकातील कुठलेही पान  वाचले  तरी उत्तर आपोआप मिळते. अजूनही gallary तले पु लं. आणि सुनीताबाई आठवण आली की  डोळ्यासमोर असतात जसेच्या तसे. 

                     
                      

Thursday, April 19, 2012

कैरी


रस्त्याने जाताना झाडावर लगडलेल्या कैऱ्या बघून  पावलं क्षणभर रेंगाळतात. डोळे विस्फारून मी झाडाकडे बघत असते; जशी आता मुलं MacD  च्या मेनू display कडे बघतात तशी.  कितीही मोठे झालो तरी काही गोष्टी आपल्यातील  बालपणाचे पुरावे देताच असतात. त्या गोष्टी दिसल्या रे दिसल्या की U turn घेउन निघतोच आपण तिकडे.  कैरीचं ही असंच आहे माझ्याबाबतीत. डिसेम्बर मध्ये झाडावर मोहोर डोलायला लागल्यावर ते कैऱ्यांना पाड लागेस्तोपर्यंतचा कैरी बरोबरचा  माझा  प्रवास तेवढाच आंबट-गोड आणि exciting असायचा.  
       माझ्या घरच्या मागच्या दारात आंब्याचे झाड होते. दर डिसेंबरमध्ये छोट्या छोट्या ख्रिसमस ट्री सारखा मोहोर दिसायला लागला  की यंदा आंबा किती येणार याचा अंदाज बांधायला सतत मान  वर  करून मी झाडाकडे बघत असायचे.  मोहोराचा सुरेख वास येत राहायचा.  गळलेल्या मोहोरातील इवल्याशा कैऱ्या पण खाव्याशा वाटायच्या. 
जातायेता दारातून, स्वैपाकघराच्या खिडकीतून माझे लक्ष असायचे. पडलेल्या बाळ कैऱ्यांचे भातुकलीत हमखास लोणचे व्ह्यायचे. थोड्याच दिवसात आम्ही मैत्रिणी मोठ्या झालेल्या कैऱ्या मोजायचो. फार देखण्या  कैऱ्या असायच्या ; एकदम करकरीत आणि आंबट गोड.  कैऱ्यांच्या बाबतीत मी खूप possessive होते. जोरात वारा आला की कौलावरून कैऱ्या गडगडत खाली पडायच्या. पण गंमत अशी की त्या खाली पडायच्या आत मी मागच्या दारात पोचलेली  असायची. माझ्या मैत्रिणींना  कैऱ्यांना हात लावून द्यायचे नाही. पण नंतर मात्र तिखट मीठ लावून आम्ही मस्त चटक मटक  करत  कैऱ्या खायचो. हळू हळू कैऱ्या काढण्याच्या दिवस यायच्या. काकू ठराविक माणसाकडून कैऱ्या उतरवायची. आम्ही कैऱ्या मोजायला असायचोच खाली. झाडात लपलेल्या कैऱ्या काढता काढता चांगल्या चारशे पाचशे कैऱ्या निघायच्या. काकू मग काही कैऱ्यांचे सारखे वाटे  करून कॉलनी मध्ये प्रत्येकाच्या घरी कैऱ्या देण्यासाठी आम्हाला पाठवायची. आणि उरलेल्या कैऱ्यांचे मग मोरंबा, लोणचे आणि अढी. ते तीन चार महिने मनात कैऱ्या आणि फक्त कैऱ्याच.  
      मागच्या वर्षी काकूला घेवून कॉलनीत जाऊन आले. मागच्या दारी आंब्याचं झाड नव्हतं. छोटी मुलं आजूबाजूला खेळत होती आमच्यासारखीच. जरावेळ पायरीवर बसले
झाडाच्या आठवणीत आनंदात वेळ गेला. आता मी काय आणि माझ्या मैत्रिणी काय किलोवर कैऱ्या घेत असतो त्या कैऱ्यांची आठवण काढत.
       कैऱ्या, बुचाची फुलं, गोवऱ्या, ऊस, बैलगाड्या या गोष्टी चित्रात दिसल्या तरी भानावर यायला थोडा वेळ लागतो मला. कैऱ्या विकत घेताना तर हटकून आठवण येते गावाची. या गोष्टींशी जुळलेली नाळ सहजासहजी सुटत नाही. शेवटी गावाकडची मी कुठेही राहिले तरी गावाकडचीच राहणार.
      

Friday, March 9, 2012

jogging track

         एखादी गोष्ट करायला किंवा चालू ठेवायला काहीसं motivation लागतं, नाहीतर सुरवातीचा उत्साह  नंतर झपाट्याने दिसेनासा व्हायचा संभव असतो. माझ्या jogging  किंवा brisk walking  म्हणूयात; त्याबाबतीत हि असंच काहीसं व्हायला लागला होतं. ४५ मिनिटे सलग चालायचं, ( weight  loss करायचं म्हंटल्यावर आजूबाजूने दहा-बारा सल्ले येतात त्यापैकी हा एक सल्ला)  नंतर नंतर अगदी जीवावर आलं होतं. एकतर भराभर चालायचं , त्यात मैदानावर असलेल्या  बालविकास मंडळातील मुलांचे पालक jogging  track वर गप्पा मारत बसलेले असतात, त्यातून वाट काढत फिरायचं , मोठ्या मुलांचा फुटबाल आता अंगावर येईल कि नंतर याकडे लक्ष द्यायचं हे नाही म्हणायला जरा बोअर व्हायला लागलं. मग वेळ बदलली. जरा उशीरा जायला लागले. कधी आमच्याच कॉलनीत आणि वेळ असलाच तर पुलोद्यानात जायला लागले. 
         आता जरा बदल जाणवायला लागला.  jogging  track च्या बाहेरील बाजूला नगरसेवकांच्या कृपेने छानशा खुर्च्या ठेवलेल्या आहेत. त्यावर बसून वेगवेगळ्या वयाची मंडळी  आपलं मन (बहुतेक mobile वरच ) मोकळं करत असतात. फिरता फिरता काही गोष्टी कानावर पडू लागतात.  प्रत्येकाचं वयानुसार बोलणं जरा इंटरेस्टिंग वाटू लागतं . एक विशीतली मुलगी, " शेवटी तुझ्या नशिबात लव्ह marriage च होतं ना." (यातल्या 'ना 'पुढे पूर्णविराम, प्रश्नचिन्ह किंवा उद्गारवाचक चिन्ह यापैकी कुठलंच फिट होणार नाही असं स्वर होतं तिचा.)  एक मध्यमवयीन गृहस्थ,' आता अर्ज दिलायस ना मग मी बाकीचं बघून घेतो." असं शासकीय भाषेत बोलत होते. मध्ये  काही college मधले मित्र, " तीन महिन्याने सांगितला तिने मला कि I am  not interested ."   " अगं तो मला पहिल्या डेट ला दगडूशेठ गणपतीला जाउ म्हणाला." आणि मग  धो धो हसणं. यात माझा अर्धा तास कसा निघून जातो ते कळत नाही. 
       पुलोद्यानात तर वेगळंच प्रकरण आहे. तिथे अर्ध्याहून अधिक मुलं आपल्या गर्ल्फ्रेन्डचा  तळ्याकाठी, टेकडीवर, धबधब्याच्या पार्श्वभूमीवर फोटो काढण्यात बिझी असतात.  त्यांचा मधून जाताना excuse me म्हणत मलाच अपराधी वाटतं. असंच एकदा फिरता फिरता मी धबधबयाजवळच्या बाकावर टेकले. पाचच मिनिटात एक जोडपं मागच्या बाकावर येउन बसलं. लग्न ठरलं असावं बहुधा. झालं, तो जो काही बोलत सुटला; काही तक्रारी काही सूचना आणि बरंच काही. आजूबाजूची हिरवळ, पाण्याचा खळाळता आवाज याबाबत जरा उदासीनताच दिसली.तीचा आवाज मात्र एकदाही आलं नाही. हे एकतर्फी स्वगत मी मागे वळून पाहिल्यावर थांबलं.  एक दिवस तर मजाच झाली. त्याच जागेवर माझ्या शेजारी दोन जुळी बाळे, त्यांची आई आणि आजी होत्या. माझ्या आधीच होत्या तिथे. एक बाळ आईकडे झोपले होते तर एक आजीकडे खेळत होते. आजीकडच्या  बाळाने डायपर बदलायची वेळ आणली. आईकडच  बाळ तर झोपलं होतं, मग इकडे तिकडे बघत काहीशा संकोचाने तिने झोपलेले बाळ 'जरा घ्याना' म्हणत माझ्याकडे सोपवले. मला क्षणभर मी मूर्तीमंत आई च दिसते की काय असं वाटून गेलं. इथेही तेच?:)) बर डायपर लवकर बदलून बाळाला घ्यावं की नाही! तर मायलेकींच्या गप्पा सुरूच.  मला वाटलं हे बाळ उठलं तर बरं होईल पण ते ही माझ्या कुशीत इतकं मस्त झोपलं होतं की माझीही उठायची पंचाईत.  थोड्या वेळाने त्यांचा साग्रसंगीत कार्यक्रम उरकल्यावर बाळ आईकडे सुपूर्द केले. आणि मी परत पाण्याचा आवाज ऐकत राहिले. 
      पूर्वी मी  राहुल बोसचा ' Everybody says I am fine '   हा चित्रपट पहिला होता. त्यातल्या protagonist ला (हिरो) त्याच्या client च्या मनातले समजत असते. तसं काहीसं फिरताना वाटतं. वेगळे स्वभाव, आनंद, reactions . प्रत्येक जण वेगळा त्याचं विश्व वेगळं त्याचं आभाळही वेगळं. 
आता फिरायला जाताना वेगळ्या motivation ची मला गरज पडत नाही. पाउणतास  मस्त जातो. 



Saturday, December 31, 2011

एक मस्त योगायोग.

 आज कासट पेट्रोल पंपावरून येताना मृत्युंजय मंदिरापाशी थांबलेच. दररोज संध्याकाळी जाताना वाटायचे कि थांबावं आणि फुलं घ्यावीच केसात माळायला. फुलांसाठी जीव टाकणं हे लहानपणापासूनच होतंच . कुंद, मोगरा, देशी गुलाब, नेवाळी( माझ्या मैत्रिणीकडे हे झाड होतं.), जाई-जुई, शेवंती  आणि सोनचाफा.  सगळ्या फुलांना एक एक करून न्याय मिळायचाच. आणि कस काय माहित नाही पण  हे  कुठेतरी थांबलं. technology  च्या महापुरात प्रचंड वेगाने चाचपडताना ( हो कारण अजूनही मला असंच वाटतं की  technology  ही सर्वात मोठी गर्ता आहे ,' मारियाना' नाही. ) मनापासून आनंद देणाऱ्या गोष्टी विसरूनच गेल्यासारख्या झाल्या होत्या. पण काही दिवसांपासून मात्र आवर्जून निशिगंध घरात यायला लागला, मोगरा उशाशी असायचा, देशी गुलाब मात्र पुण्यात फार कमी दिसला. 
        आज मात्र मी ठरवून सोनचाफा आणला आणि केसात माळलाच. आणि वाटलं हेच ते. आपलीच एखादी हरवलेली गोष्ट एकदम सापडावी तसं झालं.  आपण miss करतो त्या अशाच छोट्या छोट्या गोष्टी.  ज्या आपल्यासाठीच असतात आणि आपल्याला फक्त आनंदच देतात.  
 त्या नंतर net वर हा फोटो दिसला. असं वाटलं  खरच की ज्या बोटानी रोज आपण keyboard  आणि  mouse  ला दिवसभर कुरवाळत असतो त्याच बोटांनी एखाद फुल माळायला काय हरकत आहे.
खरतर ही अगदीच छोटी गोष्ट आहे पण ती मला खूप खुश करून गेली खरी.:)) एक मस्त योगायोग.