माझ्या दीड वर्षाच्या भाचीला , तीन वर्षाच्या भाच्याला आणि माझ्या मुलांना एकत्र असताना कधी जिंगल्स, किंवा कार्टून नेटवर्क वरचं टायटल साँग उस्फूर्तपणे गात असताना मी नेहमी ऐकते. पण खरी मजा येते ती ते एकेकटे खेळण्यांशी खेळत असताना, इलेक्ट्रोनिक gadgets हाताळताना मस्तपैकी गुणगुणत असतात तेंव्हा. खरा सूर तेंव्हा लागलेला असतो.
मग नुसतं गुणगुणण्या पासून ते मैं हू जीयान, साउंड ऑफ म्युझिक पर्यंत मस्त गाणी रेंगाळतात कानावर. परवा मुलं शीळ वाहवून गाणं म्हणायचा प्रयत्न करीत होती. म्हटलं अरे खरंच की. बरेच दिवसात असं शीळ वाजवून कुणी गाणं गुणगुणलेलं कानावर पडलंच नाही.
गाणं गुणगुणायला असं काय लागतं... नाही का? फारच सोप्पं आहे. :-)
सकृतदर्शनी हे जरी खरं असलं तरी सहज तोंडातून एक लकेर निघणं हे येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.
आम्हाला शाळेत एक गोष्ट होती. एक राजा फर्मान काढतो कि "आज पासुनी सर्व बोलणे व्हावे केवळ गाणे गाणे . केवळ गाणे आणि तराणे , चालणार नच इतर फलाणे." आणि त्यानंतर प्रजेची आणि खुद्द राजाची खूप त्रेधा तिरपीट उडते. आम्ही मैत्रिणी त्यानंतर बरेच दिवस सगळं गाण्यात बोलून पोटभरून हसायचो. नंतर ये शाम मस्तानी सारखी शीळ वाजवायचा ही प्रयत्न केला गेला पण फारसं जमलं नाही. शेजारी अनिलमामाच्या घरातून शास्त्रीय संगीतातले सूर यायचे कानावर. रात्र रात्रभर गाणी म्हणून जागवलेल्या मंगळा गौरी , गाण्याच्या भेंड्या ... गाणं म्हणजे तुम्ही आनंदात आहात याचं प्रतीकच. दुसरं तात्विक कारण कशाला शोधायचं ; नाही का?shower खाली म्हणलं काय, जिने उरताना स्वतःच्या तंद्रीत शीळ वाजवून म्हणलं काय किंवा मुलांचे डबे भरताना गुणगुणला काय! शेवटी गाणं ओठावर आलं की खुशाल समजावं माणूस जिवंत गडी आहे खरा. मनात असतं तेच ओठावर येतं.
खरं सांगू, गाणं कधीच न गुणगुणणाऱ्या माणसांची मला भीती वाटते. कारण खरंच हे येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.
No comments:
Post a Comment